दिलीप वळसे पाटील,देवदत्त निकम यांच्या चुकीच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला मोठा फटका..
शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील बेट भागात यंदाची झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूकीची लढत अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘राजेंद्र गावडे ‘ यांच्या रुपाने कधी नव्हे ते “कमळ” फुलले असून पंचायत समितीची दोन्हीही जागा कमळाच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून माजी आमदार पोपटराव गावडे हे या निकालाने सुखावले आहे . विजयी सभेत त्यांनी विरोधकांवर खालच्या भाषेत चांगलेच तोंडसुख घेतल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या पराभवामागे स्थानिक पातळीवरील आंबेगावातील बड़े नेते दिलीप वळसे पाटील यांनी कोणताही पुढाकार न घेता बेट भागातील कोणत्याही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे काम करण्यास सांगितले नाही.तसेच तिकीट वाटपातील अचानक बदल आणि वरिष्ठ नेत्यांतील मतभेद हे प्रमुख कारण ठरत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
या घडामोडींमध्ये आंबेगावचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि तुतारी गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांची भूमिका राष्ट्रवादीला मात्र मारक ठरली आहे. राजेंद्र गावडे यांचे राष्ट्रवादीकडून अचानक तिकीट कापण्यात आल्याने बेट भागातील समीकरणे पूर्णपणे बदलली होती. गावडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि हीच नाराजी पुढे मतदानात स्पष्ट दिसून आली. योग्य नियोजनामुळे व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना व्यवस्थित हाताळल्यामुळे कमळाचे काम सुलभ होऊन विजय साकारण्यात मदत झाली.
दरम्यान दामूअण्णा घोडे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देण्यात आले. या निर्णयामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचा मोठा वाटा होता. परंतू वळसे पाटील यांना या प्रक्रियेत विचारात घेतले गेले नाही, अशीही चर्चा होत आहे. परिणामी, त्यांनी या निवडणुकीत अपेक्षित सक्रियता दाखवली नाही. तसेच निवडणुकीदरम्यान वळसे पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हासाठी स्पष्टपणे मतदानाचे आवाहन केले नाही, तसेच प्रभावी संघटनात्मक यंत्रणा उभारली नाही, असा आरोप घोडे गटाकडून केला जात आहे. या निष्क्रियतेचा थेट फायदा भाजपला झाल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट झाले.
दुसऱ्या बाजूने देवदत्त निकम यांनीही आपले राजकीय डावपेच खेळले. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घोडे यांनी आपले काम न केल्याची शंका त्यांना होती. त्याचे उट्टे काढण्याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला अशी चर्चा होत आहे.
दामूआण्णा घोडे राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर निकम यांनी डॉ. सुभाष पोकळे यांना बळ देत त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले. डॉ. पोकळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. त्याआधी बाळासाहेब डांगे यांनाही पाठिंबा देण्याचे संकेत निकम यांनी दिले होते. मात्र अचानक मतदानाच्या दोन दिवस आधीच निकम समर्थकांचा कल अचानक भाजपकडे वळला. गावडे घराणे निकम यांचे कार्यकर्ते फोडण्यात यशस्वी झाले. यात निकमचाही हात असल्याची चर्चा सुत्रांकडून व्यक्त होत आहे . या घडामोडींमुळे डॉ. पोकळे यांची मतं अपेक्षेपेक्षा कमी पडली.विशेष म्हणजे, डॉ. पोकळे यांना पंचायत समिती सदस्यांपेक्षाही कमी मते मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निकमने “आपल्यालाच फसवले” अशी भावना त्यांच्या गटात व्यक्त होत असल्याचे स्थानिक सूत्र सांगत आहे. बाळासाहेब डांगे हे मशाल चिन्हावर लढून मराठा कार्डवर मतदान मागत होते. डांगे व पोकळे या दोघांच्याएवढी मते एकट्या दामूआण्णा घोडे यांना पडली.
या सर्व घडामोडींनी निकम आणि वळसे पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत आता राष्ट्रवादी पक्ष व शरदचंद्र पवार ( तुतारी ) पक्ष या भूमिकेवर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
या सगळ्या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फायदा मात्र भाजप उमेदवार राजेंद्र गावडे यांना झाला. राष्ट्रवादीकडून तिकीट कापल्यानंतर गावडे घराण्याने भावनिक भूमिका घेत नागरिकांसमोर आपली बाजू मांडली. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी आपल्या मुलासाठी थेट जनतेकडे साद घालत “स्वाभिमानाची लढाई” अशी हाक दिली. या भावनिक आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.गावडे यांनी केवळ भावनिक मुद्द्यांवर भर न देता काटेकोर पणे आर्थिक नियोजन, बूथनिहाय रणनीती आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभारून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीतील नाराज गट, शिवसेनेतील संभ्रमित मतदार आणि भाजपचा पारंपरिक मतदार वर्ग यांची यशस्वी सांगड घालण्यात ते यशस्वी ठरले. परिणामी, बेट भागात प्रथमच कमळ फुलले आणि राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला भेदला गेला.
या निकालामुळे दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेट भागात त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे. आगामी पंचायत समिती, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये या पराभवाची सावली त्यांच्या राजकीय समीकरणांवर पडू शकते.
एकूणच, बेट भागातील हा निकाल केवळ एका जागेचा पराभव नसून राष्ट्रवादीच्या अंतर्गत विसंवादाचा आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून घेतलेले निर्णय, समन्वयाचा अभाव आणि गटबाजी यामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेतृत्वाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
बेट भागात राष्ट्रवादीचे बडे नेते पाठीमागे नसतानाही दामू आण्णा घोडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. काही मतदारांनी चारही उमेदवारांकडून लक्ष्मी दर्शन घेऊन चांगलाच हात साफ केल्याचीही चर्चा आहे.या सर्व कारणांमुळे आंबेगावातील बड्या नेत्यांवरील विश्वास कमी होऊन त्यांचे वर्चस्व कमी होणार असून आगामी काळात त्याचे पडसाद उमटणार हे नक्की..

