
शिरूर, दि. ०७ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. तालुक्यात एकूण ७५.५९ टक्के मतदान झाले असून तब्बल २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या या मतदानात १ लाख १८ हजार ६८५ पुरुष, १ लाख ९ हजार ४२२ महिला तसेच ६ तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. ग्रामीण भागातही सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ मतदारांचा उत्साह लक्षणीय ठरला.
तालुक्यातील विविध सात गटांमध्ये मतदानाचा टक्का समाधानकारक ते उच्च राहिला.
टाकळी हाजी गटामध्ये टाकळी हाजी मतदान केंद्रावर ८०.७४ टक्के, तर कवठे येमाई येथे ७५.९९ टक्के मतदान झाले.
न्हावरे गटात शिरूर ग्रामीण व न्हावरे परिसरात ७२.६९ ते ७५.०१ टक्क्यांपर्यंत मतदान नोंदविले गेले.
रांजणगाव गणपती व कारेगाव परिसरात मतदारांचा उत्साह विशेष दिसून आला. येथे अनुक्रमे ८१.३७ टक्के व ८०.८५ टक्के मतदान झाले.
पाबळ–केंदूर गटात मतदानाचा टक्का ७२.८३ ते ७६.९४ दरम्यान राहिला.
शिक्रापूर–सणसवाडी गटात तुलनेने कमी म्हणजे ७०.६६ व ७१.७० टक्के मतदान झाले.
तसेच तळेगाव ढमढेरे, रांजणगाव सांडस केंद्रांवर ७५.७१ ते ८१.१२ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
वडगाव रासाई–मांडवगण फराटा गटात महिला मतदारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.यामध्ये ७२.१३ % व ७१. ९७ % मतदान झाले
महिला मतदारांचा वाढता सहभाग
या निवडणुकीत महिला मतदारांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. अनेक मतदान केंद्रांवर महिलांचे मतदान ७२ टक्क्यांहून अधिक राहिले असून काही ठिकाणी महिलांचा टक्का पुरुषांच्या जवळपास समान दिसून आला. ही बाब ग्रामीण लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.
प्रशासनाचा चोख बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली होती. तालुक्यात ३७१ मतदान केंद्राध्यक्ष, १,११३ मतदान अधिकारी, ३७१ शिपाई व ३७१ पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास सक्त बंदी घालण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
निकालापूर्वीची अस्वस्थ प्रतीक्षा…
मतदान शांततेत पार पडले असले, तरी निकाल जाहीर होईपर्यंतची एक दिवस–एक रात्रीची प्रतीक्षा उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांसाठी तणावपूर्ण ठरत आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागणार, हे लवकरच स्पष्ट होईल; मात्र त्यानंतर गावांतील सामाजिक सलोखा टिकेल का, हा खरा कस आहे.
‘बगल बच्च्यांचे’ राजकारण आणि गावकीला धोका..
निवडणुकांच्या काळात काही गावांत हेतुपुरस्सर अफवा पसरवणे, कानभरणी करणे, जुने वाद उकरून काढणे अशा प्रवृत्ती डोके वर काढताना दिसतात. काही तथाकथित ‘खबरी लाल’ कार्यकर्त्यांमुळे जीवाभावाचे संबंध ताणले जातात. यामुळे गावातील एकोपा धोक्यात येतो आणि विकासाऐवजी वादाची बीजे पेरली जातात.
काही नेतेही अशा अप्रमाणित माहितींवर अवलंबून राहून निर्णय घेत असल्याने अनावश्यक विरोधक निर्माण होतात. याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसतो. विकासाच्या चर्चेपेक्षा गटबाजीचे राजकारण पुढे येते, ही गंभीर बाब आहे.
निवडणूक संपली, वैरही संपले पाहिजे
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. त्या संपल्यानंतर वैरही संपले पाहिजे, हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत आहे. निकाल काहीही लागो, गाव आणि गावकरी हेच अंतिम सत्य आहे. स्वच्छ प्रशासन, सर्वांगीण विकास आणि सामाजिक सलोख्यासाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येण्याची गरज आहे.
लोकशाहीवरील ठाम विश्वास टिकवायचा असेल, तर निकालानंतर एकतेचा, सलोख्याचा संदेश देणे हीच काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

