दामू अण्णांना झेडपीपर्यंत नेण्याचा संकल्प
शिरूर | प्रतिनिधी
“होतील की नाही?” म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गावागावात नवचैतन्य संचारले आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्यासाठी झेडपीची पायरी चढणे हे प्रत्येक नेतृत्वाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न आता केवळ नेत्याचे न राहता बेट भागातील सामान्य माणसाचे सामूहिक ध्येय बनले आहे.
बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुका, आंबेगाव व जुन्नर परिसर ज्या नेतृत्वाच्या प्रेमात पडला आहे, ते नाव म्हणजे — टाकळी हाजीचे भाग्यविधाते दामू अण्णा घोडे. आजच्या पैशांच्या राजकारणात धनदांडग्यांच्या बळावर सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा सुरू असताना, पैशाच्या जोरावर नव्हे तर माणुसकीच्या ताकदीवर हजारो हृदयांवर राज्य करणारे नेतृत्व म्हणजे दामू अण्णा. फाटक्या खिशाचा हा फकीर माणूस जनतेच्या मनाचा राजा कसा बनतो, हेच आजच्या राजकारणातील न उलगडलेले कोडे ठरत आहे.
मागील अनेक वर्षांपासून बेट भागातील सामान्य माणूस मनात एकच स्वप्न बाळगून आहे —
“कशालाही सामोरे जाऊ, पण दामू अण्णांना झेडपी सदस्य करूच!”
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करताच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते, अशी ठाम भावना गावोगावी व्यक्त होत आहे. दामू अण्णा यांनी अर्ज भरला, त्यांची रणनीती काय असेल, ते निवडणूक कशी लढवणार — या चर्चांपेक्षा सामान्य माणसाची भूमिका अधिक ठाम आहे.
“वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न आपल्यालाच साकार करायचं आहे. आपलं पवित्र मत दामू अण्णा या लोकनेत्यालाच द्यायचं आहे,” असा निर्धार मतदारांनी केला आहे.
जनतेच्या प्रचंड आग्रहामुळे दामू अण्णा निवडणुकीच्या रणांगणात उतरतीलच, अशी भावना सर्वत्र आहे. शेत-शिवारातील कामे बाजूला ठेवून, या लोकनेत्याला झेडपीपर्यंत पोहोचवण्यासाठी रंजल्या-गांजलेल्या, दुबळ्या सामान्य माणसाने जिवाचं रान करण्याचा संकल्प केला आहे. आपल्या आणि भावी पिढीच्या शाश्वत विकासासाठी बेट भाग दामू अण्णांकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
दरम्यान, निवडणूक अर्ज भरून झाल्यानंतर शिनगरवाडी, म्हसे, आमदाबाद, मलठण आदी भागांत मतदारांच्या भेटीगाठीसाठी दामू अण्णा गेले असता मतदारराजांनी त्यांचे जोरदार आणि उत्स्फूर्त स्वागत केले.“खऱ्या अर्थाने आमच्या घरातील, गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणारा हक्काचा नेता आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे दामू अण्णांसाठी आम्ही शेवटपर्यंत, ताकदीने काम करू,” अशी भावना मतदारांनी व्यक्त केली.
“अण्णा, लोकभावना ओळखा. निवडणूक आता सामान्य माणसाने हातात घेतली आहे. अनेक वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाला सत्यात उतरायची संधी द्या,” — अशी साद आज संपूर्ण बेट भागातून घुमत आहे.


