शिरूर, दि. १९ (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दामूआण्णा घोडे यांना उमेदवारी मिळाल्याने गेले अनेक महिने प्रचार करणारे राजेंद्र गावडे व गावडे घराण्याला मोठा जबर धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागा आल्याने हा गट आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटाची साथ देत दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राजेंद्र पोपटराव गावडे यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याप्रमाणे त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. ऐन वेळी अनपेक्षितपणे त्यांच्या उमेदवारीला कात्री लागल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून राजेंद्र गावडे यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क साधत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उभी केली होती. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा आधार घेत त्यांनी मतदारांमध्ये चांगली पकड निर्माण केली .मात्र, अचानक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राजकीय समीकरण बदलले. टाकळी हाजी येथील माजी सरपंच, जे शरद पवार गटाकडून इच्छुक होते, त्यांनाच थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून घड्याळ चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने या निर्णयामुळे घोडे यांच्या गोटात आनंद साजरा करण्यात आला मात्र गावडे कुटुंब व समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. या अनपेक्षित घडामोडीनंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. कार्यकर्त्यांचा सन्मान आणि मतदारसंघाचा स्वाभिमान सर्वोच्च आहे. पुढील निर्णय सर्वांच्या सल्ल्यानेच घेतला जाईल,असे सूचक विधान करत पोपटराव गावडे यांनी लवकरच आपली पुढील भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावडे यांची उमेदवारी नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पोपटराव गावडे यांच्यामुळेच तालुक्याचा विकास झाला. पक्षापेक्षा नेतृत्व पाहून ही निवडणूक लढवावी, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पोपटराव गावडे यांचे विश्वासू सहकारी आर. बी. गावडे यांनी बुधवारी भाजपचा झेंडा हातात घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाणार असल्याचे सांगितल्याने गावडे गट भाजपमध्ये प्रवेश करणार , याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
राजेंद्र गावडे यांनीही भूमिका मांडताना सांगितले की, आमच्या कुटुंबाने आजवर वळसे पाटील साहेबांसाठी निष्ठेने काम केले. मात्र विरोधात काम करणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली. राजकारण हा आमच्यासाठी व्यवसाय नसून लोकसेवा आहे. निवडणुका येतात–जातात, पण शेवटपर्यंत मी जनतेसाठी लढत राहीन.
पोपटराव गावडे यांनीही बोलताना, जनतेने नेहमीच मला न्याय दिला आहे . मी आतापर्यंत १२ निवडणुका लढवल्या असून एक वगळता सर्व जिंकल्या आहेत,असे सांगत पक्षांतराचा निर्णय सर्वांच्या मताने घेतला जाईल, असे स्पष्ट केले. भाजप सत्तेत असून मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचे वक्तव्य केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिकच बळावली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गावडे यांच्याशी संपर्क साधला असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातील लढत आता अधिकच रंगतदार होणार असून, गावडे गटाची पुढील राजकीय दिशा काय असेल, याकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


