जिल्हा परिषदेसाठी ३७, पंचायत समितीसाठी १२० अर्जांची विक्री
शिरूर, दि. १७ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद सात गट व पंचायत समितीच्या चौदा गणांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शिरूर तहसील कार्यालयात सुरू झाली आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जात असून निवडणूक काळात उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सात गटांसाठी आतापर्यंत ३७ उमेदवारी अर्जांची, तर पंचायत समितीच्या चौदा गणांसाठी १२० अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान शिरूर तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात सुरू राहणार आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी करण्यात येणार असून २३ ते २७ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी शिरूर तालुक्यात एकूण ३३७ मतदान केंद्र असणार असून त्यापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील किंवा अति संवेदनशील नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी ४३८ केंद्राध्यक्षांची नेमणूक करण्यात आली असून २४ निवडणूक समन्वय अधिकारी, १३१४ मतदान अधिकारी व ४३८ शिपाई अशा एकूण २१९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ईव्हीएम स्टॉक रूम राज्य वखार महामंडळ, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव येथील गोडाऊन क्रमांक दोन येथे ठेवण्यात आली असून मतमोजणी राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक तीन येथे होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ३५, शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत ५० तर शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ३६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी तीन टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांपर्यंत कर्मचारी व साहित्य वाहतुकीसाठी ५५ एसटी बसेस, ४० जीप, २ मिनीबससह एकूण ९७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.


