शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, याच दिवशी तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळे शिरूरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी विजय मिळवला. या विजयामुळे शिरूर नगरपालिकेत युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याचे मानले जात आहे.यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत चिन्हांवर निवडणूक लढवली. त्यात भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले असून सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ७ नगरसेवक निवडून आले असून एका अपक्ष नगरसेविकेचा पाठिंबा मिळाल्याने या गटाचे संख्याबळ ८ झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ५ नगरसेवक निवडून आले आहेत, तर १ अपक्ष नगरसेवक आहे.
राज्य व केंद्रात सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवार) एकत्र आलेले दिसून आले होते. त्यामुळे शिरूर नगरपरिषदेतही दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन नवे राजकीय समीकरण उभे करणार का, याबाबत उत्सुकता आहे.
उपनगराध्यक्षपदासोबतच होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरही चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला संधी मिळणार की पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्त्याला प्राधान्य दिले जाणार, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत.सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक शिरूरच्या स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी ठरेल, असे चित्र आहे.


